गुरुवार, २८ जून, २०१२

राजसाहेबांना पत्र

माननीय राज साहेब,

आपल्या मराठी मुलुखातील रयतेतील माझ्यासारख्या सामान्य माणसाचा आपल्या चरणी साष्टांग दंडवत !

आपल्यासारख्या  व्यक्तीस पत्र लिहावे असे नेहमी वाटत असे. पण योग येत नव्हता. तसेच कामाच्या व्यापामुळे वेळेचा प्रश्न होता. आज मात्र ठरवले की पत्र प्रपंच करायचाच. 

माझ्याकडे आपणास सांगण्यासारखे बरेच विषय आहेत. पण सध्या मला जो महत्वाचा विषय वाटतो त्याबद्दल सांगू इच्छितो. काही दिवसांपूर्वी आपल्या एका शिलेदाराने विक्रोळी-कान्जुरमध्ये एक आंदोलन केले होते. आपल्यास ज्ञात असेल. साधारण 1-2 वर्षापूर्वी विक्रोळी-कांजूर येथील होणाऱ्या डम्पिंग ग्राउंड विरोधात आंदोलन केले होते. आपल्याच आशीर्वादाने ते आंदोलन पार पडले होते. तेव्हा आपले शिलेदार नगरसेवक होते. आंदोलनाच्या पश्चात ते आमदार झाले. वाटले की आता  डम्पिंग ग्राउंडपासून कायमची सुटका होणार. पण सुटका तर नाहीच पण चांगलाच विळखा पडला आहे. राज-रोजपणे  डम्पिंग ग्राउंड सुरु झाले आहे तेही कुठल्याही उद्घाटनाशिवाय? जनतेची इतर कामे कधी इतकी लवकर होत नाहीत. 










डम्पिंग ग्राउंड सुरु झाले याची माझ्याकडे कागदोपत्री माहिती नाही. कदाचित ते कागदावर सुरु नसेलही, पण मी माझ्या डोळ्यांनी पहिले त्यावर माझा विश्वास आहे. माझ्या घरातूनही कचऱ्याची टेकडी दिसते आहे. कचऱ्याच्या गाड्या रोज जाताना दिसतात. रोज कचऱ्याचा गंध परिसरात दरवळतो. डास ही मित्राप्रमाणे घरात येतात. आज दिसणारी टेकडी पर्वत कधी बनेल हे कळणार नाही. आपल्या शिलेदाराला सरकारी भाषा समजत असावी कारण कागदावर डम्पिंग ग्राउंड नसेल म्हणूनच  ते शांत आहेत. त्यांचा डोळ्यावर विश्वास दिसत नाही. किंवा मंत्रालयात ते खूप काम करत असावेत त्यामुळे त्यांना इकडे बघायला वेळ नाही.

मला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत कारण आपण 'मला एकदा संधी द्या मग बघा काय करतो ते' असे सांगता. आपणांस संधी मिळाली आहे. पहिल्याच प्रयत्नात 12 आमदार ही काही लहान संधी नाही. करायचे तर एक आमदारही बरेच करतो पण करायची इच्छा असावी लागते. आपल्याकडे 12 आहेत. खूप अपेक्षा  होत्या आपल्याकडून पण भरवश्याच्या म्हशीला टोणगा !

चूक तुमची नव्हे, चूक आमची आहे कारण आम्ही सामान्य माणसे मनसे विश्वास टाकतात आणि राजकारणी तो दिलसे तोडतात. आपणांस मी राजकारणी समजले नव्हते, आमच्यातीलच मानले होते. हा माणूस आपल्या मनातील भाषा बोलतो असे वाटले, अजूनही वाटते म्हणूनच हा पत्र प्रपंच. पण आपले शिलेदार मात्र वेगळ्याच विश्वात आहेत. त्याचा परिणाम आपण महापालिका निवडणुकांच्यावेळी पाहिलात.

माझ्या मागणीचा विचार करून त्यावर कार्यवाही व्हावी ही विनंती.

कळावे.

चुकभूलीची  माफी असावी.

आपला,
एक सामान्य माणूस.




गुरुवार, १४ जून, २०१२

केरळ : टोल नसलेले राज्य.


केरळ  : टोल नसलेले राज्य, तरीही अतिशय उत्तम रस्ते आहेत. 

ABP माझाच्या सौजन्याने.



महाराष्ट्रामध्ये प्रवास करताना मोजावा लागतो अवाजवी कर...पण केरळसारख्या राज्यांत अतिशय उत्तम रस्ते आहेत आणि त्या रस्त्यांच्या मेंटेनन्सच्या नावाखाली टोलची वसुलीही केली जात नाही...



बुधवार, १३ जून, २०१२

चला टोलनाके बंद करूया

कालच आदेश आला आहे टोलनाके बंद करण्याचा. त्या आदेशान्वये काही ठिकाणी आंदोलने सुरु झाली. हे फारच छान आहे. ऐकून मनाला आनंद झाला. कारण माझ्यासारखे अनेक जणांना या टोळधाडीचा त्रास होत आहे. एक मुंबई -पुणे एक्स्प्रेस सोडला तर बाकी सर्व रस्ते फारच दयनीय आहेत. त्यात त्यावर टोल? प्रत्येक सामान्य माणसाच्या मनातील चीड या आदेशाने बाहेर आली आहे. 



टोलचा हिशोब तर कधीच कळत नाही. वर्षानुवर्षे टोल  हा चालूच असतो. टोलचा त्रास हा सर्वांनाच होत आहे. प्रवासात जेवण्याच्या खर्चापेक्षा टोल  जास्त होतो. या टोलने सगळ्यांचे जीवन हराम केले आहे. या महागाईच्या पर्वात सामान्य माणूस या  टोळधाडीने आणखीनच त्रस्त झाला आहे. त्याचे जीवन त्रासून गेले आहे. आता लवकरच त्याची या टोळधाडीमधून मुक्तता होणार आहे?

याचे उत्तर 'नाही' हेच आहे. कारण आंदोलने काही दिवस होणार, तोडफोड होणार. पोलीस येणार, अटका होणार, केस दखल होणार. हाती मात्र काही येणार नाही. उलट झालेले नुकसान मात्र सामान्य माण साकडूनच टोल  वाढवून वसूल केले जाईल. मग या आदेशाचे काय? फायदा कोणाला? सामान्य माणसाला की  आदेश ज्यांनी दिला त्यांना?  याचा विचार आपणच केलेला बरा. कारण कोणीही सामान्य माणसाचा विचार करीत नाही. जो तो केवळ स्वता:चा विचार करतो. 

या आदेशाने 1-2 टोलनाके बंद होतील काही दिवसांसाठी. पण हळूच ते चालूही होतील कुणाच्याही नकळत. हीच खरी गंमत आहे. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर. सामान्य माणूस बिचारा यात भरडला जातो. 

मागे एका माननीय नेत्याने सांगितले की  काहीही झाले तरी विक्रोळीला डम्पिंग ग्राउंड होऊ देणार नाही. मोठे आंदोलन केले, पोस्टरबाजी केली, त्याबळावर विधानसभा दर्शन त्यांना झाले. पण डम्पिंग ग्राउंडचे काय झाले? काय होणार, मस्तपैकी सुरु झाले! रोज मुंबईतला कचरा त्यात टाकल जाऊ लागला. यात फायदा कोणाचा झाला? सामान्य माणसाचा, त्याला डम्पिंग ग्राउंड मिळाले की ! 

तसेच या टोलनाके बंदच्या आदेशाचे होणार. 

आज वातावरण तापले आहे. चला मजा बघूया.

बिचारा सामान्य माणूस :( 


मंगळवार, ५ जून, २०१२

शुक्राची चांदणी : सूर्यावर शुक्राचे अधिग्रहण आज दिनांक 06 जून 2012



शुक्राची चांदणी : सूर्यावर शुक्राचे अधिग्रहण आज दिनांक 06 जून 2012

अतिशय दुर्मिळ दृश्य. मुंबईत असण्याऱ्या ढगाळ वातावरणाने अनुभवता न येणारे. :(
पण ABP  माझाच्या सौजन्याने पहा. :)





बुधवार, २ मे, २०१२

पहिले प्रेम




पहिले प्रेम आठवते कधी मला 
तो पहिला स्पर्श वेडावतो मला 

चोरून चोरून बघतानाचे क्षण 
हळुवारपणे झालेले नजरभेटीचे क्षण 

पहिले वाहिले आपल्या हातांचे मिलन 
कळत नकळत घडलेले अपुल्या ओठांचे मिलन 

ते पहिले प्रेम त्या प्रेमाच्या आठवणी
ती पहिली भेट त्या भेटीच्या आठवणी

तुझा तो हवा हवासा वाटणारा सुंदर मुखडा 
लाजेने लालीलाल होणारा तुझा मुखडा 

तुझा तो आखीव रेखीव बांधा 
अप्सरा ही फिकी असा बांधा 

डोळे भरून पहावे असे तुझे यौवन
नजरेनेच  फक्त अनुभवत  राहावे तुझे यौवन 

तू अन  मी एकरूप  होताना 
अपुले श्वास धुंद होताना 

वाढत जाणारी छातीची धडधड 
परम क्षणाला शांत  होणारी धडधड 

ती पहिल्या प्रेमाची आठवण 
ती पहिल्या प्रेयसीची आठवण 

मनातूनी जाता जाई ना 
काय  करावे ते मला समजे ना 






सोमवार, ३० एप्रिल, २०१२

मराठी असे माझी मायबोली | अमृताहुनी गोडी तिज लाभली ||


अलीकडे दोन भावांमध्ये कोण मराठीचा कैवारी यावर सतत भांडणे होत राहतात. दोघेही हमरीतुमरीवर येतात. एकमेकांवर चिखलफेक करतात. लोकांची चांगली करमणूक होते. पण मराठी मात्र तशीच राहते. तिच्यामध्ये काडीमात्र फरक पडत नाही आणि पडणारही नाही. कारण कोणतीही भाषा ही खूप महान असते. (हे माझे वाक्य नाही, मी एका हिंदी चित्रपटातून घेतलेले आहे.) आपली मराठीही आहे. संत ज्ञानेश्वरांनी हे आधीच सिद्ध केलेले आहे. तेव्हा इतर कोणालाही मराठीचा कैवार घेण्याचा अधिकार नाही. 

मराठीचा अभिमान बाळगणे म्हणजे इतर भाषेचा तिरस्कार करणे नव्हे. प्रत्येक भाषा ही तितकीच मोठी आहे जितकी आपली मराठी. मराठी भाषा कधीही अंत पावणार नाही. ती सतत वाढत राहणार. अटकेपार झेंडा रोवला आहेच, त्याहून पुढे संपूर्ण जगात मराठी भाषा पसरणार आहे. गरज आहे तिच्या प्रसाराची. तिच्यावरून होणाऱ्या राजकारणाची नाही. असल्या घाणेरड्या राजकारणाने उलट ती रसातळाला जाईल. सेवती हे राजकारणीच त्यांना काय करायचं? मराठी भाषेचा अंत होत असेल तर त्यांना बरचं आहे, कारण त्यांना त्यांची पोळी भाजता येईल.

आज मराठी भाषेची स्थिती काय आहे? खरोखरच तिला वाईट दिवस आले का? याचा आपण कधी विचार केला का? याचं उत्तर नक्कीच नाही असेल. मलाही याचं उत्तर देता येणार नाही. माझ्याकडे फक्त ऐकीव माहिती आणि वर्तमानपत्रात वाचलेली माहिती आहे. यावरून हे नक्की आहे कि आपली मराठीची स्थिती लक्ष देण्यासारखी आहे. जर आपण वेळीच लक्ष दिले नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.  मी खाली काही उदाहरणे दिली आहेत त्यावरून मी हा अंदाज काढला आहे. (मी चुकीचा असू शकेल.)

१. मराठी वर्तमानपत्र इंग्रजी वर्तमानपत्रासोबत फुकट मिळते. 
२. मराठी शाळेत रोडावलेली पट संख्या.
३. दोन मराठी माणसे एकमेकांशी परभाषेतून संवाद साधतात.

मराठी भाषेच्या सद्य स्थितीला मराठी माणूस स्वत: जबाबदार आहे. दुसरे कोणी परभाषिक जबाबदार नाही. मराठी भाषिक नको तिथे अभिमान दाखवतो. जिथे दाखवायला हवा तिथे शेपूट घालतो. आधीच मराठीचा अभिमान दाखवला असता आता ही वेळ आली नसती. पाहुण्यांचे  स्वागत जरूर करायचे असते. त्यांना डोक्यावर बसवायचे नसते. मराठी माणूस इथेच चुकला. पाहुण्यांना डोक्यावर बसवले. 

अजूनही वेळ गेलेली नाही. काही चांगल्या गोष्टी मराठीबाबत होत आहे. आज मी हे मराठीतून लिहित आहे ते गुगलच्या माध्यमातून. त्यांनीही मराठी भाषेला महत्व दिले आहे. माइक्रोसोफ्टनेही मराठीला मानाचे स्थान दिले आहे. मराठी दर्जेदार चित्रपट निर्माण होत आहेत . नवीन साहित्य रोज मराठीत निर्माण होत आहे. निराश होण्याचे कारण नाही. आपणही यात थोडासा हातभार लावला पाहिजे. जसा मी काहीतरी मराठीत लिहून लावतो आहे. खाली दिलेल्या काही गोष्टी केल्या तरी मराठी भाषेचा प्रसार होईल.

१. दोन मराठी माणसांनी तरी एकमेकांशी मराठीतून संवाद साधावा.
२. मराठी वर्तमानपत्र, पुस्तके तसेच मासिके वाचावीत.
३. कामाव्यतिरिक्त लिखाण शक्य असल्यास  मराठीतून करावे. (फेसबुक, गुगल)
४. मराठी भाषा व्यवस्थित लिहा. योग्य  मात्रा आणि  वेलांट्या योग्य ठिकाणी द्या. चुकीचे मराठी लिहिणे  व बोलणे तितकेच वाईट जितके मराठी येत असताना परभाषेचा वापर करणे. 
५. कोणी चुकीच मराठी बोलत असेल त्याला त्याची चूक लक्षात आणून द्या आणि सुधारण्यास सांगा.

मराठी असे माझी मायबोली 
अमृताहुनी गोडी तिज लाभली 
मराठी असे महान 
तिला करतो मी प्रणाम

हा लेख संपवताना माझे एकच सांगणे आहे कि मराठीबद्दल अभिमान जरूर बाळगा. कोणी म्हणाले म्हणून मराठीचा अभिमान बाळगू नका. तो मनातून आला पाहिजे. तरच आपण मराठीला वाढवू शकतो.

जय हिंद , जय मराठी, जय महाराष्ट्र !!

गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

CELEBRITY WAX MUSEUM

कधी लंडनच्या मादाम तुसा मध्ये गेलात? भारतीय आणि परदेशी सुप्रसिद्ध व्यक्तींचे मेणाने बनवलेले पुतळे पाहायला? तुम्हापैकी काहींनी पहिले असतील, तर काहींनी नसतीलही. पण आता निराश होण्याची गरज  नाही कारण आपण हे सर्व आपल्या येथेही पाहू शकता. तेही आपल्या महाराष्ट्रात. मुंबई-पुण्यापासून अगदी जवळ. सध्या केवळ ३० सुप्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत. त्यातील काहींचे छायाचित्रे येथे प्रसिद्ध करीत आहे. शिल्पकाराने पुतळे  हुबेहूब बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला बऱ्याच अंशी यशही आलेले आहे. त्याने बनवलेली शिल्पे दाद देण्यासारखी आहेत. 

CELEBRITY WAX MUSEUM
ठिकाण : 
लोणावळा, जुना मुंबई-पुणे महामार्ग क्र. ४
वरसोली पुणे.

संकेत स्थळ: http://www.celebritywaxmuseum.com





























बुधवार, १८ एप्रिल, २०१२

चारोळ्या ...


आयुष्यात कोणाचीतरी साथ हवी असते

कोणाचातरी हात हातात हवा असतो 

कोणाशीतरी सतत बोलावेसे वाटते 

याला काय म्हणावे, प्रेम की म्हातारपनाची चाहुल
?





पाऊस दाटलेला, आभाळ साठवूनी।

माझ्या मनातील दु:ख, डोळ्यात ओघळूनी।

तुझी आठवण येई, प्रत्येक पावसाळ्यातूनी।

पाऊस दाटलेला..

देवा तू झोप, तुझा भक्त जागा आहे.

देऊळ चित्रपट बहुतेक जणांनी पहिला असेल. श्रद्धेचा बाजार कसा मांडला जातो याचं यथार्थ वर्णन केले आहे. देवळात बसलेली गिधाडे सामान्य माणसाचे लचके तोडायला सदैव तयार असतात. आपण देवळात कि मंडीत आहोत याचा फरक कळत नाही. आपण गिऱ्हाईक आणि पुजारी, बडवे (भXवे) हे दुकानदार असतात. इथे देवाची भक्ती, श्रद्धा विकली जाते. देव बिचारा केवळ बघत असतो. त्याच्यासमोरच त्याच्या भक्ताला लुटले जाते. तो मात्र शांत असतो. फक्त शांत, कारण देवही बिचारा या बडव्यांच्या ताब्यात आहे गुलाम म्हणून आणि गुलामाला बोलण्याचा अधिकार नसतो.

कोणत्याही प्रसिद्ध देवळाला भेट द्या. तुमचे स्वागत हारवाले, फुलवाले, नारळवाले आणि देवांचे दलाल करतात. त्यांच्यापासून सुटका केल्यानंतर समोर भली मोठी रांग तुमची वाट पाहत असते. रांगेत २-४ तास कधी - कधी ५-६ तास व्यतीत केल्यावर अखेर तो क्षण येतो देवाला पाहण्याचा. हृदयाचे ठोके वाढत जातात, डोळे भरून येतात. वाटते आता देवाचे डोळे भरून दर्शन घेऊ. देवाला आपल्या अडचणी सांगू, देवाकडे काहीतरी मागू. हा विचार डोक्यात घेऊन तुम्ही चालत असता. हातातील हार, फुले समोरच्या पुजारी / बडव्याकडे देता. हार जोडून, डोळे बंद करून मनात काही बोलत असता, त्याचवेळी एक ब(?)डवा / पुजारी जोराने ओरडतो " चला पुढे चला, येथे थांबू  नका. पुढे चला. टाइमपास करू नका."  मग तुम्ही लगबगीने पुढे जाता. मनात जे बोलायचे असते ते तसेच राहते. तुम्ही बाहेर येता. मनाला एक चुटपूट लागून राहते. देवाला नीट भेटता आले नाही. बघता आले नाही.

देवदर्शनाच्या प्रवासात नाना अडचणी असतात. पावलापावलावर देव परीक्षा घेत असतो पुजारी, दलाल यांच्या रूपाने. एका प्रसिद्ध देवस्थानात (सर्वांचे कुलदैवत) पदोपदी भक्ताची परीक्षा असते. पहिल्या पायरीपासून ते देवाच्या दर्शनापर्यंत भक्त फक्त परीक्षाच देतो आणि नापास होतो. जर पास व्हायचे असेल तर दलालाचा सहारा घ्यावा लागतो आणि थोडासा खिसा मोकळा करावा लागतो. मग भक्त पास होतो. मनासारखे डोळेभरून दर्शन, अगदी प्रसन्न वाटते. ठीक आहे थोडा खिसा रिकामा होतो. दलाल प्रत्येक ठिकाणी पैसा मागतो पण देवदर्शनाची हमी देतो. भक्ताला काय फक्त दर्शन हवे असते.



काही देवस्थानी देवाला नेसवलेले वस्त्र विक्रीस ठेवलेले असतात आणि तेही माफक किमतीत ?? बाजारूपणाचा हा कळस झाला. भक्तांनीच वाहिलेले वस्त्र भक्तांनाच विकायचे. काय म्हणावे याला? बिचारे भक्त श्रद्धेपायी विकतही घेतात. मोठ्या अभिमानाने ती वस्त्र मिरवतात. पण एक गोष्ट विसरतात, खरोखरच ती वस्त्र देवांस नेसवली? का अशीच ती विक्रीस ठेवली? भक्त याची कधीही चौकशी करत नाही, कारण तो त्याचा देवावर विश्वास आणि श्रद्धा असते. याच श्रद्धेचा हे दलाल फायदा घेतात.






देवस्थाने ही व्यावसायिक केंद्रे झालीत. जसे कोणी एक नवीन व्यवसाय सुरु करतात त्याचप्रमाणे काही टाळकी देऊळ स्थापन करतात आणि कामधंद्यास लागतात. म्हणूनच आज गल्लोगल्ली देवळे उगवलेली दिसतात. राजकीय गिधाडेही कमाऊ देवस्थानच्या महत्वपूर्ण पदासाठी हपापलेली असतात. वर्षानुवर्षे पदावर चिटकून बसतात. गेल्या महिन्यांत एका प्रसिद्ध देवस्थानच्या पदाधिकारी निवडप्रकियेत न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला कारण  राजकीय  गिधाडे  बूड हलवण्याचे नाव घेत नव्हते.


एका  प्रसिद्ध देवळावर काही कोटींचा धंदा अवलंबून असतो. हार, फुले विक्रते ते पुजारी आणि देवस्थानाचे पदाधिकारी यांचे उत्पन्न अवलंबून असते.  हार, फुले विक्रते यांचे पोट देवळावरच अवलंबून असते. पण  पुजारी आणि देवस्थानाचे पदाधिकारी यांचे तुडुंब भरलेले पोटही  देवळावर आणखी भरत असते.


श्रद्धेच्या झालेल्या बाजारीकरणाला आपणच जबाबदार आहोत. आपणच देवावर विसंबून राहतो. प्रत्येक गोष्टीत देवाची मदत लागते. देवाशिवाय आपले पानही हलत नाही. याचाच फायदा ही गिधाडे घेतात आणि आपले लचके तोडतात. हे असेच चालत राहणार, किंबहुना हे वाढत जाणार.


देवा तू झोप, तुझा भक्त जागा आहे. 




शुक्रवार, १३ एप्रिल, २०१२

मनात माझ्या ..

मनात माझ्या .. हे फक्त माझे विचार सर्वांसमोर मांडायचे माध्यम आहे. यात व्यक्त केलेले विचार हे पूर्णत: माझे आहेत. यातील कविताही माझ्या आहेत. हे सदर माझ्या मनात चाललेल्या विचारांना वाट मोकळी करून देण्यासाठी आहे. यातील लिखाणामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो. मला कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. यात व्यक्त केलेल्या विचारांवर तुम्हा सर्वांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. त्यामुळे मी माझे लिखाण अधिक चांगले करू शकेन.
मी कोणी लेखक वा कवी नाही, मला केवळ आवड आहे. त्यामुळे माझे लिखाण हे इतर लेखक वा कवींसारखे दर्जेदार होणार नाही तरीही मी चांगले लिहिण्याचा प्रयत्न करीन. माझे हे सदर केवळ मराठी भाषेतच आहे. कारण मला मराठी भाषा चांगल्याप्रकारे अवगत आहे. पण काही चुका आढळल्यास सूचना नक्की करा. सुचना अमलात आणण्याचा मी नक्की प्रयत्न करीन.


मनात माझ्या विचार दाटती
विचारांचे मग वादळ उठती
हातात मी लेखणी घेउनी
विचारांस मी शब्दांस गुंफुनी
शब्दांतून लेख जन्मती
लेखांचे मग पुस्तक होती
मनात माझ्या अन मनात माझ्या ...




बुधवार, ११ एप्रिल, २०१२

मरण, मृत्यू म्हणजे नक्की काय?

    मरण, मृत्यू म्हणजे नक्की काय? हा प्रश्न मला नेहमी पडतो. माणूस मरतो म्हणजे काय होते? काही लोक म्हणतात मरणापेक्षा जीवनाचा विचार करा. ते सर्व ठीक आहे पण मरण अटळ आहे? याचं उत्तर 'हो' च आहे. जो जन्माला आला तो मरणारच. यात काडीमात्र शंका नाही.  जिथे सुरुवात आहे, तिथे अंत आहे. पण तरीही मला हाच प्रश्न पडतो. माझे विचारचक्र सतत चालू असते. उत्तराचा शोध मला घ्यायचा आहे. मला हेही माहित आहे की याचे उत्तर सापडणे कठीण आहे.

    माझे स्व:ताचे एक मत आहे मृत्यूबद्दल. मरण म्हणजे एक झोप, कधीही न संपणारी एक झोप. माणूस रोज झोपतो आणि जागा होतो. पण जेव्हा तो कायमचा झोपतो तेव्हा तो कधीही जागा होत नाही त्यालाच मरण म्हणतात. कधी असे झाले का आपण झोपलो आणि सकाळी जाग आली की वाटते, आत्तातर झोपलो लगेच जाग आली. जो झोपेचा ८-९ तासांचा कालावधी फक्त ५-१० मिनिटांचा वाटतो. अशा झोपेला आपण गाढ झोप म्हणतो. पण मला ...

  माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. कारण मला मागील काही आठवत नाही. माझा विश्वास मी जे बघतो, मी जे अनुभवतो त्यावर आहे. मी चुकीचा असेलही. मला मृत्यूपलीकडील जग बघायचं आणि तो माझा अनुभव सर्वांना सांगायचाय. मला हेही ठाऊक आहे की ही जगातील सर्वात अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण मी मेलो की परत येणार नाही हे सत्य आहे.

  मला गूगलवर मृत्यूबद्दल शोधताना एक संकेतस्थळ सापडले. त्याच्यानुसार माणूस हा ४ शरीरांनी बनलेला आहे. १. भौतिक २.मानसिक ३. बौद्धिक ४. सूक्ष्म अहंकार वगैरे.. या संकेतस्थळवर बरचं काही लिहिले आहे.  

पण मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. पुन्हा एकदा मी वरील संकेतस्थळावरील माहिती वाचणार आहे. बघूया माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळते की नाही?



सोमवार, ९ एप्रिल, २०१२

फेसबुक





कोणाला कशाचा नाद, कोणाला कशाचा हव्यास
कोणी पैशासाठी वेडे, कोणी बाईसाठी
राजकारणी सत्तालालसी, अभिनेते प्रसिद्धीसाठी
दारुड्याला हावी दारू, देवदासला पारू
आम्ही सारे फेसबुकवर पडलेले, रात्र रात्र जागलेले
आम्हाला फक्त नाद फेसबुकचा, चाट करायचा
येथे भेटतात सारे मित्र आणि मैत्रिणी
येथे जमतात सारी नवी नाती 
आठवतात जुन्या आठवणी
फेसबुकची मजा न्यारी
विसरलो सगळी दुनिया सारी

poem by: vinod govind

सखी




चांदणे शिम्पिले दुधाळ दुधाळ
वाहतो वारा मधाळ मधाळ
गाने तुझे सुरेल सुरेल
हसने तुझे मंजुळ मंजुळ
तुझा स्पर्श हा कोमल कोमल
हवीस तू मला जवळ जवळ
रात अशी ही फुलली फुलली
त्यात सखे तू खुलली खुलली
बंध सारे तुटले तुटले
प्रणयाचे रंग भरले भरले
मदहोश ही रात सरली सरली
प्रेमाची आठवन राहिली राहिली  





poem by : vinod govind