बुधवार, १८ एप्रिल, २०१२

देवा तू झोप, तुझा भक्त जागा आहे.

देऊळ चित्रपट बहुतेक जणांनी पहिला असेल. श्रद्धेचा बाजार कसा मांडला जातो याचं यथार्थ वर्णन केले आहे. देवळात बसलेली गिधाडे सामान्य माणसाचे लचके तोडायला सदैव तयार असतात. आपण देवळात कि मंडीत आहोत याचा फरक कळत नाही. आपण गिऱ्हाईक आणि पुजारी, बडवे (भXवे) हे दुकानदार असतात. इथे देवाची भक्ती, श्रद्धा विकली जाते. देव बिचारा केवळ बघत असतो. त्याच्यासमोरच त्याच्या भक्ताला लुटले जाते. तो मात्र शांत असतो. फक्त शांत, कारण देवही बिचारा या बडव्यांच्या ताब्यात आहे गुलाम म्हणून आणि गुलामाला बोलण्याचा अधिकार नसतो.

कोणत्याही प्रसिद्ध देवळाला भेट द्या. तुमचे स्वागत हारवाले, फुलवाले, नारळवाले आणि देवांचे दलाल करतात. त्यांच्यापासून सुटका केल्यानंतर समोर भली मोठी रांग तुमची वाट पाहत असते. रांगेत २-४ तास कधी - कधी ५-६ तास व्यतीत केल्यावर अखेर तो क्षण येतो देवाला पाहण्याचा. हृदयाचे ठोके वाढत जातात, डोळे भरून येतात. वाटते आता देवाचे डोळे भरून दर्शन घेऊ. देवाला आपल्या अडचणी सांगू, देवाकडे काहीतरी मागू. हा विचार डोक्यात घेऊन तुम्ही चालत असता. हातातील हार, फुले समोरच्या पुजारी / बडव्याकडे देता. हार जोडून, डोळे बंद करून मनात काही बोलत असता, त्याचवेळी एक ब(?)डवा / पुजारी जोराने ओरडतो " चला पुढे चला, येथे थांबू  नका. पुढे चला. टाइमपास करू नका."  मग तुम्ही लगबगीने पुढे जाता. मनात जे बोलायचे असते ते तसेच राहते. तुम्ही बाहेर येता. मनाला एक चुटपूट लागून राहते. देवाला नीट भेटता आले नाही. बघता आले नाही.

देवदर्शनाच्या प्रवासात नाना अडचणी असतात. पावलापावलावर देव परीक्षा घेत असतो पुजारी, दलाल यांच्या रूपाने. एका प्रसिद्ध देवस्थानात (सर्वांचे कुलदैवत) पदोपदी भक्ताची परीक्षा असते. पहिल्या पायरीपासून ते देवाच्या दर्शनापर्यंत भक्त फक्त परीक्षाच देतो आणि नापास होतो. जर पास व्हायचे असेल तर दलालाचा सहारा घ्यावा लागतो आणि थोडासा खिसा मोकळा करावा लागतो. मग भक्त पास होतो. मनासारखे डोळेभरून दर्शन, अगदी प्रसन्न वाटते. ठीक आहे थोडा खिसा रिकामा होतो. दलाल प्रत्येक ठिकाणी पैसा मागतो पण देवदर्शनाची हमी देतो. भक्ताला काय फक्त दर्शन हवे असते.



काही देवस्थानी देवाला नेसवलेले वस्त्र विक्रीस ठेवलेले असतात आणि तेही माफक किमतीत ?? बाजारूपणाचा हा कळस झाला. भक्तांनीच वाहिलेले वस्त्र भक्तांनाच विकायचे. काय म्हणावे याला? बिचारे भक्त श्रद्धेपायी विकतही घेतात. मोठ्या अभिमानाने ती वस्त्र मिरवतात. पण एक गोष्ट विसरतात, खरोखरच ती वस्त्र देवांस नेसवली? का अशीच ती विक्रीस ठेवली? भक्त याची कधीही चौकशी करत नाही, कारण तो त्याचा देवावर विश्वास आणि श्रद्धा असते. याच श्रद्धेचा हे दलाल फायदा घेतात.






देवस्थाने ही व्यावसायिक केंद्रे झालीत. जसे कोणी एक नवीन व्यवसाय सुरु करतात त्याचप्रमाणे काही टाळकी देऊळ स्थापन करतात आणि कामधंद्यास लागतात. म्हणूनच आज गल्लोगल्ली देवळे उगवलेली दिसतात. राजकीय गिधाडेही कमाऊ देवस्थानच्या महत्वपूर्ण पदासाठी हपापलेली असतात. वर्षानुवर्षे पदावर चिटकून बसतात. गेल्या महिन्यांत एका प्रसिद्ध देवस्थानच्या पदाधिकारी निवडप्रकियेत न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला कारण  राजकीय  गिधाडे  बूड हलवण्याचे नाव घेत नव्हते.


एका  प्रसिद्ध देवळावर काही कोटींचा धंदा अवलंबून असतो. हार, फुले विक्रते ते पुजारी आणि देवस्थानाचे पदाधिकारी यांचे उत्पन्न अवलंबून असते.  हार, फुले विक्रते यांचे पोट देवळावरच अवलंबून असते. पण  पुजारी आणि देवस्थानाचे पदाधिकारी यांचे तुडुंब भरलेले पोटही  देवळावर आणखी भरत असते.


श्रद्धेच्या झालेल्या बाजारीकरणाला आपणच जबाबदार आहोत. आपणच देवावर विसंबून राहतो. प्रत्येक गोष्टीत देवाची मदत लागते. देवाशिवाय आपले पानही हलत नाही. याचाच फायदा ही गिधाडे घेतात आणि आपले लचके तोडतात. हे असेच चालत राहणार, किंबहुना हे वाढत जाणार.


देवा तू झोप, तुझा भक्त जागा आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा