अलीकडे दोन भावांमध्ये कोण मराठीचा कैवारी यावर सतत भांडणे होत राहतात. दोघेही हमरीतुमरीवर येतात. एकमेकांवर चिखलफेक करतात. लोकांची चांगली करमणूक होते. पण मराठी मात्र तशीच राहते. तिच्यामध्ये काडीमात्र फरक पडत नाही आणि पडणारही नाही. कारण कोणतीही भाषा ही खूप महान असते. (हे माझे वाक्य नाही, मी एका हिंदी चित्रपटातून घेतलेले आहे.) आपली मराठीही आहे. संत ज्ञानेश्वरांनी हे आधीच सिद्ध केलेले आहे. तेव्हा इतर कोणालाही मराठीचा कैवार घेण्याचा अधिकार नाही.
मराठीचा अभिमान बाळगणे म्हणजे इतर भाषेचा तिरस्कार करणे नव्हे. प्रत्येक भाषा ही तितकीच मोठी आहे जितकी आपली मराठी. मराठी भाषा कधीही अंत पावणार नाही. ती सतत वाढत राहणार. अटकेपार झेंडा रोवला आहेच, त्याहून पुढे संपूर्ण जगात मराठी भाषा पसरणार आहे. गरज आहे तिच्या प्रसाराची. तिच्यावरून होणाऱ्या राजकारणाची नाही. असल्या घाणेरड्या राजकारणाने उलट ती रसातळाला जाईल. सेवती हे राजकारणीच त्यांना काय करायचं? मराठी भाषेचा अंत होत असेल तर त्यांना बरचं आहे, कारण त्यांना त्यांची पोळी भाजता येईल.
आज मराठी भाषेची स्थिती काय आहे? खरोखरच तिला वाईट दिवस आले का? याचा आपण कधी विचार केला का? याचं उत्तर नक्कीच नाही असेल. मलाही याचं उत्तर देता येणार नाही. माझ्याकडे फक्त ऐकीव माहिती आणि वर्तमानपत्रात वाचलेली माहिती आहे. यावरून हे नक्की आहे कि आपली मराठीची स्थिती लक्ष देण्यासारखी आहे. जर आपण वेळीच लक्ष दिले नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. मी खाली काही उदाहरणे दिली आहेत त्यावरून मी हा अंदाज काढला आहे. (मी चुकीचा असू शकेल.)
१. मराठी वर्तमानपत्र इंग्रजी वर्तमानपत्रासोबत फुकट मिळते.
२. मराठी शाळेत रोडावलेली पट संख्या.
३. दोन मराठी माणसे एकमेकांशी परभाषेतून संवाद साधतात.
मराठी भाषेच्या सद्य स्थितीला मराठी माणूस स्वत: जबाबदार आहे. दुसरे कोणी परभाषिक जबाबदार नाही. मराठी भाषिक नको तिथे अभिमान दाखवतो. जिथे दाखवायला हवा तिथे शेपूट घालतो. आधीच मराठीचा अभिमान दाखवला असता आता ही वेळ आली नसती. पाहुण्यांचे स्वागत जरूर करायचे असते. त्यांना डोक्यावर बसवायचे नसते. मराठी माणूस इथेच चुकला. पाहुण्यांना डोक्यावर बसवले.
अजूनही वेळ गेलेली नाही. काही चांगल्या गोष्टी मराठीबाबत होत आहे. आज मी हे मराठीतून लिहित आहे ते गुगलच्या माध्यमातून. त्यांनीही मराठी भाषेला महत्व दिले आहे. माइक्रोसोफ्टनेही मराठीला मानाचे स्थान दिले आहे. मराठी दर्जेदार चित्रपट निर्माण होत आहेत . नवीन साहित्य रोज मराठीत निर्माण होत आहे. निराश होण्याचे कारण नाही. आपणही यात थोडासा हातभार लावला पाहिजे. जसा मी काहीतरी मराठीत लिहून लावतो आहे. खाली दिलेल्या काही गोष्टी केल्या तरी मराठी भाषेचा प्रसार होईल.
१. दोन मराठी माणसांनी तरी एकमेकांशी मराठीतून संवाद साधावा.
२. मराठी वर्तमानपत्र, पुस्तके तसेच मासिके वाचावीत.
३. कामाव्यतिरिक्त लिखाण शक्य असल्यास मराठीतून करावे. (फेसबुक, गुगल)
४. मराठी भाषा व्यवस्थित लिहा. योग्य मात्रा आणि वेलांट्या योग्य ठिकाणी द्या. चुकीचे मराठी लिहिणे व बोलणे तितकेच वाईट जितके मराठी येत असताना परभाषेचा वापर करणे.
५. कोणी चुकीच मराठी बोलत असेल त्याला त्याची चूक लक्षात आणून द्या आणि सुधारण्यास सांगा.
मराठी असे माझी मायबोली
अमृताहुनी गोडी तिज लाभली
मराठी असे महान
तिला करतो मी प्रणाम
हा लेख संपवताना माझे एकच सांगणे आहे कि मराठीबद्दल अभिमान जरूर बाळगा. कोणी म्हणाले म्हणून मराठीचा अभिमान बाळगू नका. तो मनातून आला पाहिजे. तरच आपण मराठीला वाढवू शकतो.
जय हिंद , जय मराठी, जय महाराष्ट्र !!



