रविवार, ७ सप्टेंबर, २०१४

निवडणूक स्पेशल

आले रे आले पुढारी आले
मतांची भीक मागायला आले

न केलेल्या कामांची जंत्री घेऊन
मतदारांच्या पायाशी लोळन घेऊन

तोंडात ठेवून साखरेचा दाणा
लाज सोडून सर्व जणा

नसलेली पुढे करती झोळी
म्हणे सर्वांना देऊ पोळी

महिना दोन महिने असेच चालेल
सारे पुढारी दारोदार भटकतील

कोणी दाखवेल ब्लू प्रिंट
कोणी आणेल व्हिजन डाॅक्युमेंट

काही म्हणतील केला आम्ही विकास
दाखवतील प्रगतीचा भास

दाखवतील अच्छे दिनाचे स्वप्न
आवळील राग विकासाचा सर्व सोडूनी

युत्या अन् आघाड्या करतील सारे
जागा वाटपासाठी भिडतील सारे

काही दिवस करतील तमाशा
निकालानंतर मतदाराला मारतीस तमाचा

आले रे आले पुढारी आले
मतांची भीक मागायला आले

by - विनोद गोविंद

सोमवार, १ सप्टेंबर, २०१४

मी या जगात नसेल तर..






मी या जगात नसेल तर..
सगेसोयरे अश्रृ ढाळतील काही काळ
मित्रही येतील सांत्वनासाठी
भडाग्नी दिल्यावर सर्वजण परतील
मी मात्र माझेच कलेवर जळताना पाहिल
आयुष्यभर शरीराला जाळत आलो
मेल्यावर फक्त राख झाली
जगताना नुसता धावत होतो
कशासाठी धावत होतो त्यास उत्तर नव्हतं
मरणानंतर माझ्याकडे वेळ आहे
एकप्रकारची शांती आहे
अगदी पिसासारखं हलकं वाटतयं
मी या जगात नसल्यावर मी मला भेटलो




                            by -- विनोद गोविंद

रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

साजणा






जाऊ नको ना साजणा, शृंगार अर्धा सोडूनी
तुझ्या सोबतीची सवय साजणा, करते मला वेडावूनी

तू मला हवा हवासा वाटतो,  माझ्या मनाच्या जिवलगा
तुझा सहवास मला वेडावतो, माझ्या मनाच्या जिवलगा
तुझा स्पर्श हा साजणा, बेधुंद करतो सोडूनी
जाऊ नको ना..

तुझ्या बाहूपाशात मज घे ना, मनाच्या अगदी जवळी
तुझ्या नजरेत मज घे ना,  नयनांच्या अगदी जवळी
तुझ्या ओठांचा स्पर्श साजणा, कासावीस मज करूनी
जाऊ नको ना..





                             by --- विनोद गोविंद

मला एकदा मरून पहायचयं





मला एकदा मरून पहायचयं
मरणानंतरचं जग अनुभवायचयं
जगून थकलेल्या शरीराला 
मरणाच्या स्वाधीन करायचयं
मला एकदा..


म्हणतात मरण सगळे पाश सोडवतं
मला सर्व पाशातून मुक्त व्हायचयं
पाखरासारखं हलकं फुलकं व्हायचयं
मला एकदा..


सुख अन् दुःख या फे-यातल्या मला
कायमचं सोडवून टाकायचयं
सुख दुःख विरहित जग मला अनुभवायचयं
मला एकदा..


पाप अन् पुण्य याने घाबरलेल्या मनाला
मोकळा श्वास घेऊन द्यायचायं
एकदातरी निर्धास्त जगायचयं
मला एकदा..





                                 by -- विनोद गोविंद

रविवार, २४ ऑगस्ट, २०१४

स्त्री

कोण जास्त सुंदर असते, नुकतीच वयात आलेली मुलगी की परिपक्व युवती. निर्णय घेणे कठीण आहे. वयात आलेली मुलगी ही कळीसारखी असते,  नाजूक. परिपक्व युवती एका फुललेल्या फुलासारखी असते. सुंदरता दोघींमध्ये असते पण एकीकडे अल्लडपणा अन् दुसरीकडे परिरक्वता. एकीकडे कोवळेपणा अन् दुसरीकडे पूर्ण विकसित काया.




विधात्याने स्त्रीला सर्वगुणसंपन्न बनविले आहे. प्रत्येक स्त्रीची रुपे विविध असतात. प्रत्येक रुपात स्त्री सुंदरचं दिसते. पण वरील दोन रुपांची बात काही न्यारी आहे. याच रुपांमध्ये स्त्री सर्वात जास्त सुंदर दिसते. सौंदर्याने मुसमुसलेली असते.

सोळा ते पंचवीस वयातील स्त्री नाजूक, अल्लड, सुरेख पण थोडीशी अपरिपक्व असते. ह्याच वयात स्त्रियांची परिपक्वतेकडे हळूहळू वाटचाल सुरु होते. येथून पुढे मुलीचे युवतीकडे अन् युवतीचे परिपक्व स्त्रीमध्ये रुपांतरण होते. हाच काळ असतो एका कळीचे फुलामध्ये रुपांतर होण्याचा, अगदी हळूवारपणे. 

अनेकांनी म्हटलयं की स्त्रिया सर्वात जास्त खुललेल्या असतात त्या तिशीनंतर. इथे मिलाफ असतो सौंदर्याचा अन् परिपक्वतेचा. Beauty with brain. पण काही मोजक्याच स्त्रियांना हे उमगत असतं. बहुतांश या वयातील स्त्रिया गुरफटून गेलेल्या असतात, स्वत:ला हरवून बसलेल्या असतात. त्यांची अवस्था गंध शोधत बसलेल्या कस्तुरीमृगासारखी असते.

दुर्दैव हेच की आपण स्त्रीला एकतर शोभेची गोष्ट नाहीतर कामाची मशीन समजत असतो. काहीजण तिला देवत्व देतात पण त्या देवत्वाचा तिला काही उपयोग नसतो. स्त्री ही शक्ती असते. तिच्यात अफाट सामर्थ्य आहे. तिला बहरुन द्यायचं असतं, अगदी तिच्यामनाप्रमाणे. तरचं आपण स्त्रीचे खरं सौंदर्य अनभवू शकतो.
                                 



 by - विनोद गोविंद

सुंदरी

मी तुझा दिवाना, मनातून मस्ताना
तु माझी राणी, चल गाऊ प्रेमगाणी ||


तुझं नटणं मुरडणं, लाजेने लालीलाल होणं
गालावरची गोड खळी, मदनाची तू मदनवळी
नयन तुझे काळेभोर, करती शिकार हळूवार
मी तुझा दिवाना...






नाजूक साजूक कटी, सुंदर तुझी हनुवटी
गच्च भरदार उरोज, करती मला बेहोश
वा काय तुझे नितंब, शहारूनी टाकी सर्वांग
मी तुझा दिवाना..


ओठांची तुझ्या बात निराळी,  रसरसीत रसाळी
नाजूक कोमल काया,  त्यावर मदनाची छाया
ओलेती तू सुंदरी, येशील ना तू मजघरी
मी तुझा दिवाना..






                                  by - विनोद गोविंद

सुख




सुखामागे धावताना
कधी मी माझा विचारच केला नाही
फक्त मला सुख हवयं ह्या विचारात
कधी सोनेरी क्षण हरवले कळलेच नाही
मला सर्व काही मिळत गेलं
पण सुखाची अनुभूती कधी झाली नाही
कधी मला सुख मिळेल
हाच सदा विचार केला
आयुष्याअखेरी मला सुखाचं रहस्य उमगलं
सुख म्हणजे नक्की काय असतं हे समजलं
सुख म्हणजे मनाचे समाधान
मानलं तर सुख नाहीतर सदा दुःखी..




                                     by विनोद गोविंद

रविवार, २७ जुलै, २०१४

पाऊसाची मजा



पाऊस पडलेला आठवतो का
पावसातलं भिजणं, धमाल करणं
गारव्यानं भिजलेले अंग शहारणं
थरथरलेल्या अंगाने गुपचुप घरात जाणं
आईच्या नजरेतून सुटणं
अन् हळूचं आंघोळीला पळणं
खरचं खूप मजा होती लहानपणी
पावसाचा आनंद होता लहानपणी
वाटतं पुन्हा लहान व्हावं
पावसाचं पाऊसपणं लुटावं
नखशिखांत भिजत राहावं
अगदी पाऊस थांबेपर्यंत..



                                     by - विनोद गोविंद



आज शनिवार आहे..

आज शनिवार आहे
विकएंडचा वार आहे
कामाचा शीण भागवायचा वार
चला जमवू मित्र चार
शोधू एखादा चांगला बार
हाणू पेग तीन चार
रात्री जावून झोपू गप्प गार..






                                     by- विनोद गोविंद


तुला विसरताना...

तुला विसरता यावं म्हणून
सोमरसाचे कडवट घोट घेतले
तुझी आठवण पुसावी म्हणून
हाती एकच प्याला घेतला
पण तुला काही विसरता आले नाही
तू म्हणालीस मला विसरुन जा
तुला माझ्यात सामावून घेतल्यानंतर
तुला विसरणं मला शक्य होईल?
एकचं प्याल्याने मी जगणं विसरलो
मी मलाही विसरलो पण..
तुला विसरता मात्र आलं नाही.
 






                                              By - विनोद गोविंद


बुधवार, ९ जुलै, २०१४

नशा




नशा ही अजब दशा ही
सुख ही अन दुःख ही
स्वप्न ही अन सत्य ही
नशा ही अजब दशा ही

एक पेग असाही
एक पेग तसाही 
कधी विक्सी ही
कधी रम ही
नशा ही अजब दशा ही

कधी इंग्लिश ही
कधी देशी ही
कधी मित्रांसोबत ही
कधी एकटाही
नशा ही अजब दशा ही

मने जुळलेही मने तुटलेही 
प्याला भरलेलाही अन रिकामाही 
नशा चांगलीही अन वाईटही 
नशा ही अजब दशा ही...






                                     by - विनोद गोविंद

शुक्रवार, ४ जुलै, २०१४

विठ्ठल नाम घेऊ





विठ्ठल नाम घेऊ
आपण वारीला जाऊ
विठू माऊली न्यारी
करा वारीची तयारी
पांडुरंग पांडुरंग नाव
वारीत सर्वांना ठावं
उभी माउली हात ठेऊनी कडेवरी
देहभान विसरुनिया नाचती वारकरी
विठू माऊली हरी विठू माऊली हरी
चला जाऊया वारी मुखे म्हणू हरी हरी
पुंडलिकावरदेव श्रीहरी विठ्ठल विठ्ठल..




                                     By - विनोद गोविंद

तुझं माझं प्रेम



माझं तुझं प्रेम होतं
म्हणून आपलं लग्न झालं
लग्न झालं म्हणून 
तन मन एक झालं
प्रेमाच्या सागरात दोघे
यथेच्छ डुंबून निघालो
पाहता पाहता दोघांमध्ये तिसरा आला
एका छोटुल्याचा जन्म झाला
तुझं अन माझं प्रेम छोटुल्याचं झालं
छोटुल्याचा मोठा कधी झाला
ते कळलंच नाही
कधी तो लांब गेला
ते उमगलंच नाही
तू अन मी, मी अन तू
फक्त दोघंच, फक्त दोघंच
वाटेवरी डोळे लावूनी त्याच्या
एकदा तरी भेटायला येईल
या एकाच अपेक्षेवरी
जगणं आपुलं चालू आहे
तुझं माझं प्रेम होतं
म्हणून आपली साथ आहे
नाहीतरी मी तसा 
तुझ्याशिवाय एकटा आहे
आयुष्याच्या संध्याकाळी
तुझीच केवळ साथ आहे
तुझं अन् माझं प्रेम आहे..

                                         



 by विनोद गोविंद



राधा किसना





राधा किसनाची वेडी
किसना मात्र काढे तिची खोडी
किसना किसना करते राधा ही बावरी
किसना अपुला गेला राधेपासूनी दूरी
राधा आपली वेडी भोळी
किसनाच्या वाटे लावे डोळी
येणार कधी रे किसना
राधेला भेटणार कधी रे किसना
राधा हसू हरवूनी गेली
किसनाच्या वाटेवरी डोळे लावून गेली
राधा किसनाची ही प्रेम कहानी 
असे ही फारच पुरानी
पण संदेश देई प्रेमाचा
उत्कट विरहाचा अन् ओढीचा..





                                            by -- विनोद गोविंद

जगणं म्हणजे काय



जगणं म्हणजे काय
ही रोजची धावपळ कशाला
काय गरज आहे स्पर्धेची
जिंकून आणि काय मिळणार
आयुष्य आपण असंच जगणार

जगणं कसं असावं
फुलाप्रमाणे कोमल की दगडासारखे राकट
शर्यत का करावी
जर जगण्याचा आनंद मिळणार नसेल
जिंकण्याचा अर्थ काय
जर सोबत कोणी नसेल

आयुष्यात प्रश्न किती
उत्तरे काय काय शोधावीत
जगताना साथ कोणाची
तर मरणाकडून काय अपेक्षा 
जीवन किती सुंदर होते
मी त्याचे काय केले
मी त्याचे काय केले..

                                       


 By - विनोद गोविंद

रविवार, २९ जून, २०१४

तुमच्यासाठी कायपण..





तुमच्यासाठी काय पण
तुम्ही म्हणाल तर
तुमच्यासाठी तारे अन् चंद्र आणू
सारं जग तुमच्या पायाशी आणू
पण आमच्या दोस्ताच्या दोस्तीशी
नाद करायचा नाय
दोस्त आपली जान असतो
दोस्तीची शान असतो
आमच्या दोस्तीच्या मधे याल
तर तुमचं काय खरं नाय..




             by - विनोद गोविंद

शाळेचे दिवस




वाटतं की पुन्हा लहान व्हावं, 
पुन्हा शाळेच्या वर्गाच्या त्याच बाकावर बसावं
गुपचुप बसून डबा खावा, तास चालू असताना
हातातील घड्याळकडे बघण्याचे निमित्त करुन मुलींकडे चोरुन बघावे
मधल्या सुटीत धमाल करावी
पीटीच्या तासाची वाट पहावी
पण.. 
हे सगळं आता हरवून गेलं, जगण्याचे लडाईत वाहून गेलं
राहिल्यात केवळ आठवणी त्या सोनेरी दिवसांच्या..





                by - विनोद गोविंद