माझं तुझं प्रेम होतं
म्हणून आपलं लग्न झालं
लग्न झालं म्हणून
तन मन एक झालं
प्रेमाच्या सागरात दोघे
यथेच्छ डुंबून निघालो
पाहता पाहता दोघांमध्ये तिसरा आला
एका छोटुल्याचा जन्म झाला
तुझं अन माझं प्रेम छोटुल्याचं झालं
छोटुल्याचा मोठा कधी झाला
ते कळलंच नाही
कधी तो लांब गेला
ते उमगलंच नाही
तू अन मी, मी अन तू
फक्त दोघंच, फक्त दोघंच
वाटेवरी डोळे लावूनी त्याच्या
एकदा तरी भेटायला येईल
या एकाच अपेक्षेवरी
जगणं आपुलं चालू आहे
तुझं माझं प्रेम होतं
म्हणून आपली साथ आहे
नाहीतरी मी तसा
तुझ्याशिवाय एकटा आहे
आयुष्याच्या संध्याकाळी
तुझीच केवळ साथ आहे
तुझं अन् माझं प्रेम आहे..
by विनोद गोविंद

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा