गुरुवार, २८ जून, २०१२

राजसाहेबांना पत्र

माननीय राज साहेब,

आपल्या मराठी मुलुखातील रयतेतील माझ्यासारख्या सामान्य माणसाचा आपल्या चरणी साष्टांग दंडवत !

आपल्यासारख्या  व्यक्तीस पत्र लिहावे असे नेहमी वाटत असे. पण योग येत नव्हता. तसेच कामाच्या व्यापामुळे वेळेचा प्रश्न होता. आज मात्र ठरवले की पत्र प्रपंच करायचाच. 

माझ्याकडे आपणास सांगण्यासारखे बरेच विषय आहेत. पण सध्या मला जो महत्वाचा विषय वाटतो त्याबद्दल सांगू इच्छितो. काही दिवसांपूर्वी आपल्या एका शिलेदाराने विक्रोळी-कान्जुरमध्ये एक आंदोलन केले होते. आपल्यास ज्ञात असेल. साधारण 1-2 वर्षापूर्वी विक्रोळी-कांजूर येथील होणाऱ्या डम्पिंग ग्राउंड विरोधात आंदोलन केले होते. आपल्याच आशीर्वादाने ते आंदोलन पार पडले होते. तेव्हा आपले शिलेदार नगरसेवक होते. आंदोलनाच्या पश्चात ते आमदार झाले. वाटले की आता  डम्पिंग ग्राउंडपासून कायमची सुटका होणार. पण सुटका तर नाहीच पण चांगलाच विळखा पडला आहे. राज-रोजपणे  डम्पिंग ग्राउंड सुरु झाले आहे तेही कुठल्याही उद्घाटनाशिवाय? जनतेची इतर कामे कधी इतकी लवकर होत नाहीत. 










डम्पिंग ग्राउंड सुरु झाले याची माझ्याकडे कागदोपत्री माहिती नाही. कदाचित ते कागदावर सुरु नसेलही, पण मी माझ्या डोळ्यांनी पहिले त्यावर माझा विश्वास आहे. माझ्या घरातूनही कचऱ्याची टेकडी दिसते आहे. कचऱ्याच्या गाड्या रोज जाताना दिसतात. रोज कचऱ्याचा गंध परिसरात दरवळतो. डास ही मित्राप्रमाणे घरात येतात. आज दिसणारी टेकडी पर्वत कधी बनेल हे कळणार नाही. आपल्या शिलेदाराला सरकारी भाषा समजत असावी कारण कागदावर डम्पिंग ग्राउंड नसेल म्हणूनच  ते शांत आहेत. त्यांचा डोळ्यावर विश्वास दिसत नाही. किंवा मंत्रालयात ते खूप काम करत असावेत त्यामुळे त्यांना इकडे बघायला वेळ नाही.

मला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत कारण आपण 'मला एकदा संधी द्या मग बघा काय करतो ते' असे सांगता. आपणांस संधी मिळाली आहे. पहिल्याच प्रयत्नात 12 आमदार ही काही लहान संधी नाही. करायचे तर एक आमदारही बरेच करतो पण करायची इच्छा असावी लागते. आपल्याकडे 12 आहेत. खूप अपेक्षा  होत्या आपल्याकडून पण भरवश्याच्या म्हशीला टोणगा !

चूक तुमची नव्हे, चूक आमची आहे कारण आम्ही सामान्य माणसे मनसे विश्वास टाकतात आणि राजकारणी तो दिलसे तोडतात. आपणांस मी राजकारणी समजले नव्हते, आमच्यातीलच मानले होते. हा माणूस आपल्या मनातील भाषा बोलतो असे वाटले, अजूनही वाटते म्हणूनच हा पत्र प्रपंच. पण आपले शिलेदार मात्र वेगळ्याच विश्वात आहेत. त्याचा परिणाम आपण महापालिका निवडणुकांच्यावेळी पाहिलात.

माझ्या मागणीचा विचार करून त्यावर कार्यवाही व्हावी ही विनंती.

कळावे.

चुकभूलीची  माफी असावी.

आपला,
एक सामान्य माणूस.




गुरुवार, १४ जून, २०१२

केरळ : टोल नसलेले राज्य.


केरळ  : टोल नसलेले राज्य, तरीही अतिशय उत्तम रस्ते आहेत. 

ABP माझाच्या सौजन्याने.



महाराष्ट्रामध्ये प्रवास करताना मोजावा लागतो अवाजवी कर...पण केरळसारख्या राज्यांत अतिशय उत्तम रस्ते आहेत आणि त्या रस्त्यांच्या मेंटेनन्सच्या नावाखाली टोलची वसुलीही केली जात नाही...



बुधवार, १३ जून, २०१२

चला टोलनाके बंद करूया

कालच आदेश आला आहे टोलनाके बंद करण्याचा. त्या आदेशान्वये काही ठिकाणी आंदोलने सुरु झाली. हे फारच छान आहे. ऐकून मनाला आनंद झाला. कारण माझ्यासारखे अनेक जणांना या टोळधाडीचा त्रास होत आहे. एक मुंबई -पुणे एक्स्प्रेस सोडला तर बाकी सर्व रस्ते फारच दयनीय आहेत. त्यात त्यावर टोल? प्रत्येक सामान्य माणसाच्या मनातील चीड या आदेशाने बाहेर आली आहे. 



टोलचा हिशोब तर कधीच कळत नाही. वर्षानुवर्षे टोल  हा चालूच असतो. टोलचा त्रास हा सर्वांनाच होत आहे. प्रवासात जेवण्याच्या खर्चापेक्षा टोल  जास्त होतो. या टोलने सगळ्यांचे जीवन हराम केले आहे. या महागाईच्या पर्वात सामान्य माणूस या  टोळधाडीने आणखीनच त्रस्त झाला आहे. त्याचे जीवन त्रासून गेले आहे. आता लवकरच त्याची या टोळधाडीमधून मुक्तता होणार आहे?

याचे उत्तर 'नाही' हेच आहे. कारण आंदोलने काही दिवस होणार, तोडफोड होणार. पोलीस येणार, अटका होणार, केस दखल होणार. हाती मात्र काही येणार नाही. उलट झालेले नुकसान मात्र सामान्य माण साकडूनच टोल  वाढवून वसूल केले जाईल. मग या आदेशाचे काय? फायदा कोणाला? सामान्य माणसाला की  आदेश ज्यांनी दिला त्यांना?  याचा विचार आपणच केलेला बरा. कारण कोणीही सामान्य माणसाचा विचार करीत नाही. जो तो केवळ स्वता:चा विचार करतो. 

या आदेशाने 1-2 टोलनाके बंद होतील काही दिवसांसाठी. पण हळूच ते चालूही होतील कुणाच्याही नकळत. हीच खरी गंमत आहे. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर. सामान्य माणूस बिचारा यात भरडला जातो. 

मागे एका माननीय नेत्याने सांगितले की  काहीही झाले तरी विक्रोळीला डम्पिंग ग्राउंड होऊ देणार नाही. मोठे आंदोलन केले, पोस्टरबाजी केली, त्याबळावर विधानसभा दर्शन त्यांना झाले. पण डम्पिंग ग्राउंडचे काय झाले? काय होणार, मस्तपैकी सुरु झाले! रोज मुंबईतला कचरा त्यात टाकल जाऊ लागला. यात फायदा कोणाचा झाला? सामान्य माणसाचा, त्याला डम्पिंग ग्राउंड मिळाले की ! 

तसेच या टोलनाके बंदच्या आदेशाचे होणार. 

आज वातावरण तापले आहे. चला मजा बघूया.

बिचारा सामान्य माणूस :( 


मंगळवार, ५ जून, २०१२

शुक्राची चांदणी : सूर्यावर शुक्राचे अधिग्रहण आज दिनांक 06 जून 2012



शुक्राची चांदणी : सूर्यावर शुक्राचे अधिग्रहण आज दिनांक 06 जून 2012

अतिशय दुर्मिळ दृश्य. मुंबईत असण्याऱ्या ढगाळ वातावरणाने अनुभवता न येणारे. :(
पण ABP  माझाच्या सौजन्याने पहा. :)