सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

मी कोविड पॉसिटीव्ह

कोविड पॉसिटीव्ह असणे हे इतर लोकांच्या दृष्टीने घृणास्पद आहे. लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन लगेच बदलून जातो. याला काहीतरी महामारी झाली अशी भावना निर्माण होते. पण का?

लोकांच्या कोविड बद्दल बरेच गैरसमज आहेत. याच गैरसमजातून लोक ताप, सर्दीसाठी डॉक्टरकडे न जाता घरच्या घरी वाफ घेणे, गोळ्या खाणे असे उपाय करत असतात. कोविड टेस्ट करणे ही फारच दूरची बाब आहे. याचा परिणाम म्हणजे अत्यंत भयंकर अवस्था जिथे ऑक्सिजनचं लावावा लागतो. मग अशा परिस्थितीत प्राणपण गमवावे लागतात.

कोविड वर उपाय एकच, तो म्हणजे घरगुती उपाय न करता चांगल्या डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार करणे. मुख्य म्हणजे कोविडबद्गल गैरसमज मनातून काढणे. सुरवातीच्या लक्षणे असतील तर कोविडला हरवणे सोपे आहे. अंगावर आजार काढू नका.

सरकारने त्यांच्या परीने फारचं चांगल्या सुविधा केल्या आहेत. प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये न जाणे हे आरोग्य आणि  खिश्याच्या दृष्टीने चांगले.

कोविड झाल्यास फक्त आपल्या आयुष्यातील १४ दिवस सरकारच्या कोविड सुविधेत व्यतीत करा, पैसा खर्च न करता, अगदी मोफत. सरकारने २४ तास वैद्यकिय सेवा उपलब्ध केली आहे.

मी ज्या मुलुंड मुंबई येथील कोविड सेंटरमध्ये आहे तिथे संपूर्ण वॉर्ड हा वातानुकूलित आहे. जेवणाची पूर्ण व्यवस्था. २४ तास वैद्यकीय सेवा आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला. २४ तास रुग्णांवर लक्ष ठेवले जाते. अश्या वैद्यकिय सुविधा कायमस्वरुपी असाव्यात.

मान्य आहे अजूनही सुधारणा करण्याची गरज आहे. पण आपले बोलणे ऐकले जाते आणि त्यानुसार बदल होत आहे. ही फार मोठी गोष्ट आहे.

मी पहिल्यांदाच एखादा सरकारी फॅसिलिटीतील माणूस चक्क सौजन्याने सेवा देताना पाहिले. इथला सर्व मेडिकल स्टाफ, वॉर्ड बॉय तसेच हॉउस किपिंग स्टाफ अत्यंत सौजन्यशील तेही PPE किट चे ओझे बाळगून, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा देत आहे.

सरकारी हॉस्पिटल म्हणजे अस्वच्छता हे समीकरण बदलून टाकले आहे. दिवसातून 5 ते 6 वेळा वॉर्डाची साफसफाई, निर्जंतूकीकरण होते.

कोविडने आपल्याला काय दिले?

कोविडने आपल्याला कठीण परिस्थितीत संघर्ष करण्याची ताकद आणि उच्च दर्जाची वैद्यकिय सुविधा.

आता सुरु असलेले कोविड सेंटर बंद न करता नंतर इतर रुग्णांसाठी आपण वापरू शकतो. लोकही अशा वैद्यकिय सुविधेसाठी माफक दर भरू शकतात.

कोविड बरा होतो ही एकचं गोष्ट लक्षात ठेवा. कोविडबद्गल असलेले सगळे गैरसमज दूर करून कोविडचा सामना करूया.

कोरोना आणि मला भेटलेल्या वल्ली

प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी घटना घडत असतात, व्यक्ती आयुष्यात येतात त्यांची कायम आठवण राहते. असाच काहीसा अनुभव मला काही दिवसांपूर्वी आला. माझी आई नेहमी म्हणते प्रत्येक गोष्टीं घडण्यामागे काही कारणे असते. आयुुष्यात येणारी प्रत्येकी व्यक्तीशी आपले काहीतरी ऋणानुबंध असते. मी या गोष्टी कधीही मनावर घेतल्या नाही. पण मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या घटनांमुळे मला माझी आई म्हणते त्यात तथ्य वाटू लागले.

झालं असं की सध्या कोरोनाच्या काळात मलाही कोरोनाची बाधा झाली. मग काय, आली बीएमसी दारी आणि दिले दोन पर्याय. खाजगी की सरकारी इस्पितळ. खाजगी म्हणजे लूट आणि सरकारी म्हणजे बजबजपूरी. पैशाचे सोंग आणता येत नाही आणि मला जरा बरं वाटत होते मग निवडा सरकारी पर्याय. झाली माझी रवानगी मुलंड येथील कोविड सेंटर येथे. इथे आल्यावर माझ्या मनाती सरकारी इस्पितळाची प्रतिमा मोडून गेली. स्वच्छता, वातानुकुलीत आणि समंजस स्टाफ हे सर्व सरकारी उपक्रमात असू शकतात यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण ते सत्य होते. हे सत्य होते की मला कोरोना झाला आहे आणि इस्पितळात दाखल झालो आहे. त्यामुळे माझी भितीने गाळण उडाली होती.

सर्व सोपास्कार उरकून मी मला बेडवर दाखल झालो. मनातून अगदी घाबरून गेलो होतो. पुढे काय होणार याचा विचार करत बसले होतो. तेव्हढ्यात एक 50 ते 55 वर्षाचे गृहस्थ माझ्याशी बोलायला लागले. त्यांनी माझी आस्थेने चौकशी केली. अगदी सकारत्मकपणे मला सगळं समजावून सांगितले. त्यांच्या बोलण्याने माझ्या मनातील भिती जरा जरा कमी होत गेली. मनात थोडा हुरुप आला होता. बोलता बोलता कळाले ते माझ्याच आजूबाजूच्या परिसरात राहतात. गेले 20 - 25 दिवसांपासून उपचार घेत आहेत. तरीपण त्यांच्यात कसलीही नकारात्मकता आली नव्हती. संपूर्ण कालावधीत ते सतत माझ्याबरोबर बोलून मी निराशहोईल याची काळजी घेत होते. ते माझ्याशीच नाही तर इतर रुग्णांची आपुलकीने चौकशी करायचे. त्या गृहस्थांचे नाव श्री. विनोद टकले.

विनोद टकले यांच्या सकारत्मकपणे बोलण्याने मी जरा रुळायला लागलो होतो. सगळ्या गोष्टी सकारत्मकपणे घेत होतो. तिस-या दिवशी इस्पितळात झाला बाथरुम आणि शौचालयातील पाण्याचा त्रास. मग काय, एक अभूतपूर्व गोंधळ. संपूर्ण दिवस तो गोंधळ चालू होता. या गोंधळात एक सद्गृहस्थ भेटले, श्री. भालचंद्र रामपूरकर. एक भारदस्त आणि टापटीप व्यक्तिमत्व. पहिल्याच भेटीत स्वतः ची छाप टाकणारे व्यक्तिमत्व. सगळ्यांची आपुलकीने चौकशी करणे, मदत आणि मार्गदर्शन करणे यांचा स्वभाव. यांच्यामुळे माझ्या अनेक लोकांशी ओळखी झाल्या. यांच्या गप्पा आणि विनोदी संभाषण यामुळे इस्पितळातील कालावधी हा सुसह्य झाला. गंमत म्हणजे भालचंद्र हे माझ्या इमारतीत राहतात हे मला इस्पितळात कळाले. सर्व रुग्ण समस्या घेऊन यांच्याकडे. हे ही जमेल तसे मार्गदर्शन करायचे. He must be borned leader. यांच्यामुळे इस्पितळात जेवण्याच्या बाबतीत काही सुधारणा झाल्या. अजूनही काही छोट्या मोठ्या सुधारणा यांनी सुचवल्या. हे सद्गृहस्थ भेटले नसते तर त्यांना भेटलेल्या विठ्ठलाला मला भेटताच आले नसते.

विठ्ठल गव्हाणे, वय 63 वर्ष, शरीरावर वयाचा प्रभाव म्हणजे केस, दाढी पांढरे होणे हीच काय वयाची लक्षणे. बाकी सर्व काही तरुणाही लाजवेल असं. सळसळता उत्साह, समोरच्या माणसाला खळखळून हसवणारे बोलणं. जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन. सतत हसतमुख. सतत इतरांचा विचार. अशा व्यक्तिमत्वाला मी प्रथमचं पहात होतो. आपल्या साध्या सोप्या भाषेत जीवनातील कठीण गोष्टी सहजपणे उलगडणे ह्याच विठ्ठलाच चांगले जमते. यांचे गाव पण पंढरपूर जवळ. हे घरातून आमच्यासाठी जेवण मागवायचे. धन्य यांचा परिवार, जो न चुकता रोज जेवण पाठवायचा. जेवताना प्रथम समोरचा पोटभर जेवतो की नाही हे पाहून स्वतः जेवायला बसायचे. यांच्यासोबत जेवताना पोट तुडुंब कधी भरायचं हे कळायचं नाही. असं वाटायचं की पांडुरंगानेच या विठ्ठलाला आमच्यासाठी पाठवले की काय. जास्त नाही फक्त 4 ते 5 दिवसांची ओळख पण असं वाटायचे की फार जुनी ओळख आहे. जेव्हा यांना डिस्चार्ज मिळाला, सहाजिक सर्वांचे डोळे ओले झाले. स्वतः विठ्ठलाच्या डोळ्यात आसवे दाटली होती. यांना भेटल्यावर भालचंद्र म्हणतात तसं मला विठ्ठल भेटला.

माझ्या इस्पितळातील संपूर्ण कालावाधीत मला अजय घाडीगावकर, राजेंद्र साणप आणि अभिराज यांच्या सारखे सकारत्मकपणे वागणारे व्यक्तिमत्वं भेटली. यांच्या सर्वांमुळे, त्यांच्या गप्पा आणि विनोदामुळे माझं तिथे राहणे सुसह्य झाले. अशा व्यक्तिमत्वांना विसरणे शक्य नाही.

मला माझ्या आईचे म्हणणे पटायला लागले. नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असेल ज्यामुळे अशा चांगल्या व्यक्तिमत्वांशी माझा संपर्क झाला. अन्यथा असंख्य लोक आयुष्यात येतात आणि जातात पण काही मोजकेचं लोक आठवणीत राहतात. तश्या ह्या काही व्यक्ती.

विनोद ढवळे